नांदेड–किनवट महामार्गावर दुहेरी बळी; अपघातांनी घेतला धोकादायक वळण
सरसम परिसर पुन्हा हादरला; नागरिकांकडून रस्ता सुरक्षेवर प्रश्न
हिमायतनगर| नांदेड–किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सरसम परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम इंदिरा नगर ते म्हसोबा नाल्याच्या मध्ये मोटरसायकल आणि एका अज्ञात वाहनामध्ये जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, लखन प्रदीप पांडे (वय 25, रा. सरसम) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अविनाश गणेश गोखले यांना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर रमेश गुंडेकर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.


दरम्यान, अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, हा प्रकार ‘हिट अँड रन’ असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाची चक्रे फिरवली असून फरार वाहनाचा शोध सुरू आहे. दरम्यान शनिवारी दुपारी अपघातात मयत झालेल्या युवकांवर सरसम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

अपघातप्रवण पट्टा बनला महामार्ग
सरसम–सोनारी–खडकी फाटा या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने हा पट्टा धोकादायक बनत चालल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांत या मार्गावर अनेक गंभीर अपघात झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला असल्याचे स्थानिक सांगतात. नागरिकांच्या मते, रस्त्यावर भेगा पडल्याने वाहनांचे संतुलन बिघडते, रस्त्यालगतची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे, आवश्यक तेथे सिग्नल, स्पीड ब्रेकर व सूचना फलकांचा अभाव आहे. यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढत असल्याचा आरोप केला जात आहे.

कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
महामार्गाच्या बांधकामात निकृष्ट दर्जा वापरल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदार व अभियंत्यांच्या कामकाजाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच तातडीने रस्त्याची दुरुस्ती आणि सुरक्षाव्यवस्था उभारावी, अशी मागणी जोर धरत आहे. या अपघातानंतर सरसम परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सतत घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




