एक वर्षापासून फरार क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी अटकेत

धर्माबाद/निझामाबाद | क्रिकेट सट्टा प्रकरणात मागील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी मनोज ओमप्रकाश मानधनी याला अखेर धर्माबाद व निझामाबाद पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर प्रकरण निझामाबाद येथील 5th Town पोलीस ठाण्यात गु.र.नं. 66/2025 अंतर्गत दाखल असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 61(2), 316(2), 111 तसेच आयटी अॅक्ट 66-D, 69(A) व सह ३, ४ तेलंगणा जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ दरम्यान क्रिकेट सट्टा चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. याचवेळी पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर (पो.स्टे. धर्माबाद) यांना गोपनीय माहिती मिळाली की, फरार आरोपी मनोज मानधनी हा धर्माबाद येथे आला आहे.

त्यानुसार निझामाबादच्या North Rural CI यांच्या पथकासोबत संयुक्त सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला असता त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. तब्बल 6 तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आरोपीला शिताफीने ताब्यात घेत निझामाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या धाडसी व संयमी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. क्रिकेट सट्टा आणि ऑनलाइन फसवणूक प्रकरणांवर पोलिसांचा वाढता अंकुश दिसून येत असून, अशा गुन्हेगारांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top