होमगार्डच्या सतर्कतेमुळे पाच महिन्यांनी वडील-मुलाची भावनिक भेट

लोहा| घरातून निघून गेलेल्या वृद्ध पित्याची तब्बल पाच महिन्यांनंतर मुलासोबत पुनर्भेट घडवून आणण्याची हृदयस्पर्शी घटना लोहा बसस्थानकात घडली. होमगार्ड जवान पांडुरंग सोनकांबळे यांच्या सतर्कतेमुळे हे शक्य झाले.

हिंगोली जिल्ह्यातील खानापूर येथील मारुती तुकाराम पवार पाटील हे वृद्ध व्यक्ती काही महिन्यांपूर्वी घर सोडून गेले होते. मुलांनी शेती विकल्याची खंत मनात ठेवून त्यांनी घर सोडले होते. पंढरपूरला जात असल्याचे सांगून ते निघाले आणि त्यानंतर तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी फिरत राहिले. गेल्या पाच महिन्यांपासून ते भटकंती करत होते.

दरम्यान, ते लोहा बसस्थानकात अत्यंत अशक्त अवस्थेत, मळक्या कपड्यांमध्ये एका कोपऱ्यात झोपलेले आढळले. त्या वेळी ड्युटीवर असलेल्या होमगार्ड जवान पांडुरंग सोनकांबळे यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले. तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या या वृद्धाला त्यांनी प्रथम अन्न व पाणी देऊन आधार दिला.

त्यानंतर सोनकांबळे यांनी त्यांची विचारपूस करून त्यांच्या कुटुंबीयांचा संपर्क शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा फोन केल्यानंतर अखेर त्यांचा मुलगा गजानन पवार यांच्याशी संपर्क झाला. वडिलांची माहिती मिळताच त्यांनी त्यांना घरी पाठवण्याची विनंती केली.

या कार्यात होमगार्ड जवान पी.डी. वाघमारे, ज्योती सोनवणे, शिवाजी राठोड, एकनाथ उल्लेवार तसेच महिला होमगार्ड शारदा कदम आणि माया गायकवाड यांनीही सहकार्य केले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून वृद्ध पित्याची मुलासोबत पुनर्भेट घडवून आणण्यात आली. या घटनेमुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले असून, होमगार्डच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!