
नांदेड| भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिनानिमित्त सोमवार, ६ एप्रिल रोजी नांदेड दक्षिण जिल्हा कार्यालयात उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.


गांधी पुतळ्याजवळील भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख तसेच महापौर कविताताई मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक “वंदे मातरम्” गीताने झाली.


या प्रसंगी डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या संकल्पनेतून पक्षाच्या ४६ वर्षांच्या प्रवासाचे दर्शन घडविणारी विशेष प्रदर्शनी भरविण्यात आली होती. या प्रदर्शनीचे उद्घाटनही अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. स्थापना दिनानिमित्त कार्यालयाची आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. फटाक्यांची आतिषबाजी करून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मिठाई वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाला प्रवीण साले, लक्ष्मणराव ठक्करवाड, माणिकराव लोहगावे, नंदकुमार कुलकर्णी, बालाजीराव देशपांडे, एल. के. कुलकर्णी, मोहनसिंग तोर, प्रभाकर पेटकर, महेश खोमणे, नगरसेवक अभिषेक सौदे, आशिष नेरलकर, सुमित मुथा, नगरसेविका शांभवी साले, अमृताताई परिहार, ज्योतीताई कल्याणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



संघटन वाढीवर भर – डॉ. हंबर्डे – भाजपा स्थापना दिनानिमित्त ६ ते १२ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाचा इतिहास, ध्येय-धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती, कार्यकर्त्यांशी संवाद आदी उपक्रमांचा समावेश असून, पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी दिली.
