नांदेडची शांतता राखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा – रविकांत गायकवाड

नांदेड| जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आल्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रविकांत गायकवाड यांनी गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र चे जिल्हाध्यक्ष रविकांत गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, गेल्या तीन दिवसांत नांदेड शहरात पाच खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नांदेड शहरातील ई-स्क्वेअर परिसरातील तिहेरी खून, विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात झालेला खून, तसेच मुरमुरा मार्केट आणि श्रीनगर भागातील सलग घटना या अत्यंत धक्कादायक असून, या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनांमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा परिस्थिती अधिक बिघडू शकते, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच, शहरात दिवसरात्र सर्व मुख्य रस्त्यांवर पोलीस गस्त वाढवावी, जेणेकरून गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण होईल, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, अविनाश कुमार हे शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ अधिकारी असल्याचे नमूद करत, त्यांनी तात्काळ ठोस उपाययोजना करून नांदेडकरांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नांदेड शहराची शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी नागरिकांचीही एकमुखी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!