नांदेडमध्ये “कायापालट” उपक्रमाचा मानवतेचा स्पर्श

नांदेड| शहरात उपेक्षित, निराधार आणि मानसिक आजारग्रस्त व्यक्तींना सन्मानाने जगण्याची नवी दिशा देणारा “कायापालट” उपक्रम एप्रिल महिन्याच्या पहिल्या सोमवारी ७४ व्या महिन्यातही अत्यंत तळमळीने पार पडला. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून यावेळी ४७ भ्रमिष्ट व्यक्तींना स्वच्छतेसह सन्मानाचे जीवन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या ७४ महिन्यांत ३७०० हून अधिक बेघर, भिकारी आणि मानसिक आजारग्रस्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा हा उपक्रम आता नांदेडच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे.

या उपक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, ॲड. चैतन्य देशमुख, भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख तसेच लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, सन्मित्र फाउंडेशन आणि अमरनाथ यात्रेकरू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.

रस्त्यावर राहून स्वतःची ओळख हरवलेल्या आणि अस्वच्छतेत दिवस काढणाऱ्या व्यक्तींमध्ये या उपक्रमामुळे आश्चर्यकारक बदल दिसून आला. लाभार्थ्यांना मोफत दाढी-कटिंग, साबणाने स्नान, नवीन कपडे, चहा-फराळ तसेच प्रत्येकी १०० रुपयांची मदत देऊन त्यांच्यात “आपणही समाजाचा एक भाग आहोत” ही भावना रुजवण्यात आली.

सुरेश शर्मा, अरुण काबरा, संजयकुमार गायकवाड, प्रभुदास वाडेकर आणि महेंद्र शिंदे यांनी शहरातील विविध भागांतून लाभार्थ्यांना गोळा करून पहाटे गोवर्धन घाट येथे आणले. राजू अण्णा पुसनूर आणि प्रसाद यांनी दाढी-कटिंगची जबाबदारी सांभाळली. स्नानासाठी पाण्याची व्यवस्था कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी केली. सुभाष बंग यांनी बनियन उपलब्ध करून दिले. डॉ. अर्जुन मापारे यांनी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार केले, तर स्नेहलता जायस्वाल, जयश्री ठाकूर आणि रेखा नगारे यांच्या हस्ते नवीन कपड्यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमानंतर सदाशिव कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा कर्मचाऱ्यांनी गोवर्धन घाट परिसराची स्वच्छता करून “स्वच्छता हीच खरी सेवा” हा संदेश दिला. दरम्यान, येत्या मे महिन्याच्या पहिल्या रविवारी शहरात असहाय्य, मानसिक आजारग्रस्त किंवा उपेक्षित व्यक्ती आढळल्यास भाजप किंवा लायन्स क्लबच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!