आ. प्रतापराव पाटील यांचे विकास व्हिजन; लोहा शहरात बदलाची नवी दिशा

लोहा| लोहा नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शहराच्या विकासाला वेग आला असून विविध महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या कामांमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज मुख्य चौकाचे सुशोभीकरण विशेष लक्षवेधी ठरत आहे. सुमारे ४० लाख रुपये खर्चून या चौकाचा कायापालट करण्यात येत असून, काम पूर्ण झाल्यानंतर हा चौक शहराच्या वैभवात भर टाकणारा ठरणार आहे.

जुन्या लोहा शहरातील मस्जिद ते पूल हा प्रशस्त सिमेंट रस्ता पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेले भव्य बुद्ध विहार अंतिम टप्प्यात असून, स्वामी समर्थ मंदिर परिसरात एक कोटी रुपयांचे ‘नमो उद्यान’ साकारले जात आहे.

शहरात प्रवेश करताना आकर्षक दिसणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवा ध्वज उभारण्यात येणार असून, अत्याधुनिक प्रकाशयोजनेमुळे संपूर्ण परिसर उजळून निघणार आहे. दरम्यान, नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करिम शेख आणि त्यांच्या टीमने “स्वच्छ, सुंदर शहर” हा उपक्रम हाती घेत शहरात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत दुकानदारांनी दुकानासमोर बॅनर न लावण्याच्या सूचना देत शिस्तीवर भर दिला.

शिवजयंतीनिमित्त “बॅनरऐवजी पुस्तके द्या” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला, ज्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी बॅनर फक्त नगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी लावावेत आणि सामाजिक, विधायक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

याशिवाय, शहरातील सार्वजनिक शौचालयाचे काम लवकरच पूर्णत्वास येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात असून, जगतज्योति महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. एकूणच, आ. प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून लोहा शहरात विकासाची नवी लाट दिसून येत असून, शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!