मूक वेदनेपासून स्वाभिमानापर्यंत : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली स्त्री मुक्ती
भारतीय समाजजीवनाच्या प्रदीर्घ इतिहासात स्त्रीच्या वाट्याला अनेकदा अंधारच आला. तिच्या हातात कर्तव्यांची ओझी होती, पण अधिकारांची शिदोरी नव्हती. तिच्या डोळ्यांत स्वप्ने होती; परंतु त्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी आकाश नव्हते. तिच्या कुशीत संसार जन्म घेत होता, पण तिच्या स्वतःच्या जीवनाला सन्मानाचे स्थान दिले जात नव्हते. कधी परंपरेच्या नावाखाली, कधी धर्माच्या नावाखाली, तर कधी समाजव्यवस्थेच्या कठोर चौकटीत स्त्रीला केवळ सहन करणे, गप्प राहणे आणि आयुष्यभर झिजत राहणे— एवढेच जणू तिच्या वाट्याला आले होते. शतकानुशतके चालत आलेल्या या मूक वेदनेने तिच्या अस्तित्वावर जणू सावली टाकली होती.
अशा या वेदनांनी व्यापलेल्या काळात एक महामानव उभा राहिला—भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी स्त्रीच्या डोळ्यांतले अश्रू पाहिले आणि त्या अश्रूंमागची असह्य वेदना ओळखली. त्यांनी स्त्रीकडे दयेने नव्हे, तर न्यायाच...
