मूक वेदनेपासून स्वाभिमानापर्यंत : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली स्त्री मुक्ती

भारतीय समाजजीवनाच्या प्रदीर्घ इतिहासात स्त्रीच्या वाट्याला अनेकदा अंधारच आला. तिच्या हातात कर्तव्यांची ओझी होती, पण अधिकारांची शिदोरी नव्हती. तिच्या डोळ्यांत स्वप्ने होती; परंतु त्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी आकाश नव्हते. तिच्या कुशीत संसार जन्म घेत होता, पण तिच्या स्वतःच्या जीवनाला सन्मानाचे स्थान दिले जात नव्हते. कधी परंपरेच्या नावाखाली, कधी धर्माच्या नावाखाली, तर कधी समाजव्यवस्थेच्या कठोर चौकटीत स्त्रीला केवळ सहन करणे, गप्प राहणे आणि आयुष्यभर झिजत राहणे— एवढेच जणू तिच्या वाट्याला आले होते. शतकानुशतके चालत आलेल्या या मूक वेदनेने तिच्या अस्तित्वावर जणू सावली टाकली होती.

अशा या वेदनांनी व्यापलेल्या काळात एक महामानव उभा राहिला—भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी स्त्रीच्या डोळ्यांतले अश्रू पाहिले आणि त्या अश्रूंमागची असह्य वेदना ओळखली. त्यांनी स्त्रीकडे दयेने नव्हे, तर न्यायाच्या दृष्टीने पाहिले. त्यांनी तिला कुणाची सावली मानले नाही; तर तिला स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र विचार आणि समान हक्कांची अधिकारी मानले. त्यांच्या विचारांत स्त्री ही दयेची पात्र नव्हती, तर ती समानतेची हक्कदार होती. म्हणूनच बाबासाहेबांचे महिलांसाठीचे कार्य हे केवळ सामाजिक सुधारणा नसून, मानवी मुक्तीच्या इतिहासातील एक तेजस्वी क्रांती आहे.

बाबासाहेबांना ठामपणे वाटत होते की, कोणत्याही समाजाची खरी प्रगती मोजायची असेल, तर त्या समाजातील स्त्रियांची स्थिती पाहिली पाहिजे. कारण ज्या समाजात स्त्रीला मान नाही, त्या समाजाचे वैभव अपूर्ण असते; ज्या घरात स्त्रीच्या कष्टांना किंमत नसते, त्या घरातील आनंद अपुरा असतो; आणि ज्या राष्ट्रात स्त्रीला समानतेचा अधिकार नाही, त्या राष्ट्राची लोकशाही अधुरी राहते. म्हणूनच त्यांनी महिलांच्या शिक्षणापासून रोजगारापर्यंत, मातृत्वापासून संपत्तीपर्यंत, मतदानापासून वैवाहिक हक्कांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात न्यायाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या कार्यामागे केवळ कायद्याचा विचार नव्हता, तर स्त्रीच्या आयुष्याला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा, ही करुणा आणि दूरदृष्टी होती.

Screenshot

भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्त्रीला मिळालेला मतदानाचा हक्क. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेचा विचार प्रत्यक्षात उतरवला. सार्वत्रिक प्रौढ मताधिकारामुळे प्रत्येक स्त्रीला पुरुषाइतकाच राजकीय अधिकार मिळाला. शतकानुशतके जिचा आवाज दडपला गेला होता, तिच्या बोटावरची शाई राष्ट्रनिर्मितीची साक्ष बनली. तिचे मत आता केवळ मत नव्हते, तर तिच्या अस्तित्वाची ओळख बनले.

याचप्रमाणे स्त्रीला संपत्तीपासून दूर ठेवण्याची परंपरा त्यांनी ठामपणे नाकारली. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रीला वारसा हक्क, संपत्तीतील समान हिस्सा, विवाहातील समानता आणि घटस्फोटाचा अधिकार देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न केला. त्या काळातील समाजासाठी हे विचार धक्कादायक होते, परंतु बाबासाहेबांसाठी ते न्यायाचे अपरिहार्य तत्व होते. वारसा हक्क हा केवळ मालमत्तेतील हिस्सा नव्हता; तो स्त्रीच्या स्वाभिमानाचा दस्तऐवज होता. तो तिच्या अस्तित्वाला दिलेली कायदेशीर मान्यता होती.

स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत नाजूक, वेदनादायी पण तितकाच पवित्र काळ म्हणजे मातृत्वाचा काळ. एका नव्या जीवाला जन्म देताना ती मृत्यूच्या दाराशी जाऊन परत येते; पण त्या काळात कामगार महिलांना विश्रांतीचा किंवा संरक्षणाचा हक्क नव्हता. मातृत्व ही जणू तिची वैयक्तिक जबाबदारी आहे, समाजाशी त्याचा काही संबंध नाही— अशी अन्यायी धारणा प्रबळ होती. अशा वेळी बाबासाहेबांनी प्रसूती रजेच्या हक्काचा विचार पुढे आणला. त्यांनी कामगार महिलांच्या आरोग्याचा, त्यांच्या शरीराचा आणि त्यांच्या मातृत्वाच्या सन्मानाचा प्रश्न कायद्याच्या केंद्रस्थानी आणला. हा केवळ रजेचा हक्क नव्हता; हा स्त्रीच्या जीवनदायी शक्तीला दिलेला मान होता. हा तिच्या वेदनांना दिलेला सन्मानाचा स्पर्श होता.

बाबासाहेबांनी स्त्रीच्या मुक्तीचा सर्वात प्रभावी मार्ग शिक्षणात पाहिला. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा त्यांचा संदेश स्त्रियांसाठी तितकाच महत्त्वाचा होता. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरज्ञान नव्हे; ते आत्मसन्मानाचे, आत्मविश्वासाचे आणि स्वातंत्र्याचे दार उघडणारे साधन आहे. शिक्षित स्त्री ही केवळ स्वतःचा नाही, तर संपूर्ण समाजाचा उद्धार करू शकते, हा त्यांचा विश्वास होता.विवाहसंस्थेतही त्यांनी समानतेचा आग्रह धरला. एकपत्नीत्व, घटस्फोटाचा अधिकार आणि सन्मानावर आधारित नातेसंबंध— या संकल्पनांमुळे स्त्रीला अन्यायातून मुक्त होण्याचा मार्ग मिळाला. त्यांनी विवाहाला बंधन नव्हे, तर सन्मानाचे नाते बनवण्याचा प्रयत्न केला. कामगार क्षेत्रातही त्यांनी महिलांच्या संरक्षणासाठी, सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी महत्त्वपूर्ण कायदे केले. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली आणि स्त्रीला आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला केला.

परंतु बाबासाहेबांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे समाजाच्या मानसिकतेत परिवर्तन घडवणे. त्यांनी स्त्रीला स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला शिकवले. “तू दुर्बल नाहीस, तू हीन नाहीस; तू सन्मानाची अधिकारी आहेस,” हा आत्मविश्वास त्यांनी तिच्या मनात चेतवला. त्यांच्या आंदोलनांत महिलांचा मोठा सहभाग होता, कारण त्यांना बाबासाहेबांत त्यांच्या वेदनेचा खरा आवाज दिसत होता.आजची सशक्त, आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी भारतीय स्त्री ही बाबासाहेबांच्या विचारांची जिवंत प्रतिमा आहे. ती शिक्षण घेत आहे, निर्णय घेत आहे, समाजात आपले स्थान निर्माण करत आहे आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभी राहत आहे. तिच्या प्रत्येक यशामागे बाबासाहेबांचे विचार उभे आहेत.

आज जेव्हा भारतीय स्त्री आत्मविश्वासाने उभी राहते, तेव्हा तिच्या प्रत्येक पावलामागे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जाणवते. तिच्या डोळ्यांत आता भीती नाही, तर स्वप्नांची चमक आहे; तिच्या चालण्यात संकोच नाही, तर स्वाभिमानाची ठामता आहे.म्हणूनच बाबासाहेबांचे कार्य केवळ इतिहास नाही; ती एक जिवंत प्रेरणा आहे. त्यांनी पेटवलेली समानतेची ज्योत आजही तेवते आहे— प्रत्येक स्त्रीच्या स्वप्नांत, तिच्या संघर्षांत आणि तिच्या यशात. आणि म्हणूनच— जिथे जिथे स्त्री सन्मानाने उभी राहते, तिथे तिथे बाबासाहेबांचे विचार जिवंत असतात.

…लेखक : ॲड. दिलीप ठाकूर, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!