मराठी ही रोजगाराभिमुख भाषा; विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य विकसित करावे : राम तरटे
यशवंत महाविद्यालयातील उद्घोधन वर्गात मार्गदर्शन; 'बारा आण्याची बोंब' कथाकथनाने रंगली मैफल
नांदेड | मराठी भाषा ही केवळ साहित्यापुरती मर्यादित नसून पत्रकारिता, कथालेखन, संपादन, मुद्रितशोधन, अनुवाद, आशयलेखन (कंटेंट रायटिंग), माध्यम क्षेत्र तसेच स्पर्धा परीक्षांमध्येही रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणारी भाषा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी केले.
यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात आयोजित उद्घोधन वर्गात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. राम तरटे यांनी विद्यार्थ्यांना मराठी विषयातील करिअरच्या विविध संधींची सविस्तर माहिती देत, पत्रकारिता, संपादन, मुद्रितशोधन, अनुवाद, माध्यम क्षेत्र आणि आशयलेखनात मराठी जाणकारांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे सा...

