
यशवंत महाविद्यालयातील उद्घोधन वर्गात मार्गदर्शन; ‘बारा आण्याची बोंब’ कथाकथनाने रंगली मैफल
नांदेड | मराठी भाषा ही केवळ साहित्यापुरती मर्यादित नसून पत्रकारिता, कथालेखन, संपादन, मुद्रितशोधन, अनुवाद, आशयलेखन (कंटेंट रायटिंग), माध्यम क्षेत्र तसेच स्पर्धा परीक्षांमध्येही रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणारी भाषा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी केले.



यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात आयोजित उद्घोधन वर्गात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. राम तरटे यांनी विद्यार्थ्यांना मराठी विषयातील करिअरच्या विविध संधींची सविस्तर माहिती देत, पत्रकारिता, संपादन, मुद्रितशोधन, अनुवाद, माध्यम क्षेत्र आणि आशयलेखनात मराठी जाणकारांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षांमध्येही मराठी भाषा व साहित्याचा सखोल अभ्यास महत्त्वाचा ठरतो, असे नमूद करत विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि प्रभावी अभिव्यक्ती कौशल्य विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.



अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी भारतीय शिक्षणव्यवस्थेत ‘शिक्षण’ आणि ‘दीक्षा’ या दोन्ही घटकांचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक काळात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, बहुविद्याशाखीय अध्ययन आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा स्वीकार करावा, असे सांगत महाविद्यालयातील ग्रंथालय, डिजिटल सुविधा आणि ई-बुक्सचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ. संजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. विभागाचा परिचय डॉ. विश्वधर देशमुख यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. प्रज्ञा इंगोले यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. गोदावरी काननुकले यांनी करून दिला. आभार प्रदर्शन डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी केले.


‘बारा आण्याची बोंब’ने उडवला हास्यकल्लोळ
कार्यक्रमाच्या शेवटी राम तरटे यांनी सादर केलेल्या ‘बारा आण्याची बोंब’ या विनोदी कथाकथनाने सभागृहात अक्षरशः हास्याचा वर्षाव केला. ग्रामीण जीवनातील खुसखुशीत प्रसंग, बिलोली परिसरातील अस्सल मराठी बोलीभाषेचा प्रभावी वापर आणि ओघवत्या निवेदनशैलीमुळे विद्यार्थी, प्राध्यापक आणि उपस्थित श्रोते खळखळून हसले. मनोरंजनासोबतच सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या या कथाकथनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.
