होमगार्डच्या सतर्कतेमुळे पाच महिन्यांनी वडील-मुलाची भावनिक भेट
लोहा| घरातून निघून गेलेल्या वृद्ध पित्याची तब्बल पाच महिन्यांनंतर मुलासोबत पुनर्भेट घडवून आणण्याची हृदयस्पर्शी घटना लोहा बसस्थानकात घडली. होमगार्ड जवान पांडुरंग सोनकांबळे यांच्या सतर्कतेमुळे हे शक्य झाले.
हिंगोली जिल्ह्यातील खानापूर येथील मारुती तुकाराम पवार पाटील हे वृद्ध व्यक्ती काही महिन्यांपूर्वी घर सोडून गेले होते. मुलांनी शेती विकल्याची खंत मनात ठेवून त्यांनी घर सोडले होते. पंढरपूरला जात असल्याचे सांगून ते निघाले आणि त्यानंतर तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी फिरत राहिले. गेल्या पाच महिन्यांपासून ते भटकंती करत होते.
दरम्यान, ते लोहा बसस्थानकात अत्यंत अशक्त अवस्थेत, मळक्या कपड्यांमध्ये एका कोपऱ्यात झोपलेले आढळले. त्या वेळी ड्युटीवर असलेल्या होमगार्ड जवान पांडुरंग सोनकांबळे यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले. तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या या वृद्धाला त्यांनी प्रथम अन्न व पाणी देऊन आधार दिला....
