स्टॉप डायरिया अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ; जलजन्य आजार रोखण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन
नांदेड | पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डायरिया व अन्य जलजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने 'स्टॉप डायरिया अभियान' या विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींनी शुद्ध पाणीपुरवठा, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी आणि गावांमध्ये स्वच्छता राखण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांनी केले.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार तसेच जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई उपस्थित होते.
'स्वच्छ जल, समुचित स्वच्छता – डायरियापासून बचावाची खात्री' या ब्रीदवाक्याखाली १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्या...
