अनोळखी निराधार रुग्णाला मिळाला मायेचा आधार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयातून मदर तेरेसा शांतिनिकेतनमध्ये पुनर्वसन
नांदेड| उपचारानंतर अनोळखी व निराधार रुग्णाला सुरक्षित निवारा, काळजी आणि आधार मिळवून देत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील औषधवैद्यकशास्त्र विभागाने माणुसकीचा संवेदनशील परिचय दिला. सुमारे ६० वर्षीय रुग्णाचे मदर तेरेसा होम शांतिनिकेतन, मालटेकडी येथे सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यात आले.

सदर रुग्णास ८ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय, हिंगोली येथून १०८ रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या कक्ष क्रमांक ३४ मध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील बेरुळा येथील रहिवासी असल्याचे समोर आले. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी औंढा नागनाथ पोलीस ठाण्याशी पत्रव्यवहार करून नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. मात्र, रुग्णाची देखभाल करण्यासाठी जबाबदार नातेवाईक उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णाची उपचारोत्तर स्थिती व सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी मशिनरीज ऑफ चॅरिटी, मदर तेरेसा होम शांतिनिकेतन, मालटेकडी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

२९ सप्टेंबर रोजी औषधवैद्यकशास्त्र विभागाने रुग्णाची डिस्चार्ज प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून वाहनचालक श्री. आवराळे व कक्ष सेवक मारुती राठोड यांच्या समवेत रुग्णास मदर तेरेसा शांतिनिकेतन येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले.

या कार्यासाठी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे तसेच औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. शीतल राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) संतोष मुंगल यांनी रुग्णालय, पोलीस प्रशासन आणि मदर तेरेसा शांतिनिकेतन यांच्यात समन्वय साधत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली. उपचारासोबतच निराधार रुग्णाला सुरक्षित निवारा आणि मायेचा आधार मिळवून देण्याच्या या उपक्रमातून ‘रुग्णसेवा हीच समाजसेवा’ या भावनेचा प्रत्यय आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!