
विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम, सायबर सिक्युरिटी, नवीन शैक्षणिक धोरण व स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन


हिमायतनगर, प्रतिनिधी| हु. ज. पा. महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत अभ्यास केंद्र क्रमांक 85108 येथे वाणिज्य विभाग व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने उद्बोधन सत्र उत्साहात संपन्न झाले.


महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र संयोजक प्रा. एम. पी. गुंडाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजू बोंबले, प्रमुख वक्ते डॉ. गजानन दगडे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. सय्यद जलील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण व हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


प्रमुख पाहुणे श्री. राजू बोंबले यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची तसेच पाठ्यपुस्तकांची माहिती देत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. डॉ. सय्यद जलील यांनी सायबर सिक्युरिटी कोर्सचे महत्त्व, त्यातील संधी आणि विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे कशा पद्धतीने पाहावे, याबाबत मार्गदर्शन केले.


प्रमुख वक्ते डॉ. गजानन दगडे यांनी वाणिज्य व कला शाखेतील विविध अभ्यासक्रमांची माहिती देताना नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) उपलब्ध शैक्षणिक संधींचे विवेचन केले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रॅगिंगपासून दूर राहावे, यासाठी अँटी रॅगिंगच्या उपाययोजना व नियमांची माहितीही त्यांनी दिली.

अध्यक्षीय समारोपात प्रा. एम. पी. गुंडाळे यांनी शिक्षणक्रमाची संरचना, अभ्यासक्रमाचा आराखडा, माजी विद्यार्थी उपक्रम, स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा स्पर्धांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास केंद्र सहाय्यक श्री. जोगी, तांत्रिक सहाय्यक कोल्हेवाड, राजू डोंगरगावकर, साहेबराव आसळकर, राहुल भरणे, प्रभू पोरजवार यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. पी. गुंडाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संगपाल इंगळे यांनी केले.
