स्व. सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार अनुराधा ढालकरी यांना जाहीर

१७ सप्टेंबर रोजी नांदेडच्या नियोजन भवनात पुरस्कार वितरण सोहळा

नांदेड, प्रतिनिधी| प्रशासकीय सेवेत निष्ठा, कर्तव्यदक्षता आणि प्रभावी निर्णयक्षमतेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या परभणीच्या अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी पैंजणे यांना यंदाचा ‘स्व. सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता नांदेड जिल्हाधिकारी परिसरातील नियोजन भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ही माहिती मुख्य संयोजक तथा दैनिक समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

मीमांसा फाऊंडेशन, दैनिक समीक्षा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप आणि पत्रकार प्रेस परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. या उपक्रमाचे यंदा १८ वे वर्ष आहे.

‘स्व. सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार’ हा केवळ नांदेड किंवा मराठवाड्यापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्रासह देशभरात प्रशासन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला प्रदान केला जातो. गतवर्षी हा पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटीच्या उपायुक्त सौ. रंजना देशमुख यांना प्रदान करण्यात आला होता.

कर्तव्यनिष्ठ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतींना अभिवादन

स्व. सरोजताई विवेक देशपांडे यांनी यंत्र अभियांत्रिकी विभागात वीस वर्षांहून अधिक काळ उपअभियंता तसेच कार्यकारी अभियंता म्हणून उल्लेखनीय प्रशासकीय सेवा बजावली. कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून काम करत असतानाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपलेसे करणाऱ्या, संवेदनशील आणि मनमिळावू गृहिणी म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख होती.

कर्तव्य, माणुसकी, संवेदनशीलता आणि नेतृत्वगुणांचा संगम असलेल्या त्यांच्या प्रेरणादायी कार्याच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणाऱ्या महिलांचा गौरव व्हावा, या उद्देशाने त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.

यंदा महसूल विभागातील प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव, धडाकेबाज निर्णयक्षमता, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधीलकी जोपासत प्रभावी काम करणाऱ्या श्रीमती अनुराधा ढालकरी पैंजणे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

या पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, पत्रकार बांधवांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे लातूरचे संपादक रामेश्वर धुमाळ, प्रदेश प्रभारी अरविंद जाधव पाटील, सहसंयोजक बालाजी दुधंबे, उपाध्यक्ष प्रा. अमृत जाधव, उपसंपादक ज्ञानेश्वर पवार, सुनील कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष दत्ताजी मोहिते, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, महानगराध्यक्ष रमेश देवडे, तसेच सौ. सुनिता चौहाण, सौ. सुनीता गबाळे, श्रीमती उषा हडोळतीकर, सौ. अरुणा पुरी, सौ. पद्मावती झंपलवाड, शिवहरी गाडे यांच्यासह मुख्य संयोजक तथा मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!