
मनोहर शिरगिरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न


बिलोली, प्रतिनिधी| महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती कार्ला बू. येथील जिल्हा परिषद शाळेत तब्बल तीन दशके ज्ञानदानाची सेवा बजावणारे शिक्षक मनोहर हणमंतराव शिरगिरे यांच्या सेवापूर्ती निमित्त सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात पार पडला. गावकरी, नातलग, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींच्या उपस्थितीत शिरगिरे सरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभियंता श्रीपाद बसवंतराव पाटील होते, तर प्रमुख वक्ते म्हणून सीमावर्तींचे मुख्य समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव बसवंतराव मुंडकर उपस्थित होते. प्रमुख वक्ते गोविंदराव मुंडकर यांनी कार्ला बू. येथील शाळेच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण आवाहन केले. ते म्हणाले, “कार्ला बू. ची शाळा भविष्यात टिकली पाहिजे. शाळा टिकली तरच भविष्यात अशा सेवापूर्ती सोहळ्यांचे आयोजन करता येईल. त्यासाठी शिक्षकांसह गावकऱ्यांनीही शाळेच्या विकासासाठी सहकार्य केले पाहिजे.”


शाळा हे केवळ शिक्षण देण्याचे केंद्र नसून संस्काराचे केंद्र आहे, असे सांगत त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले. विशेषतः वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संगोपन करणे आणि त्याचा वाढदिवस साजरा करण्याची कार्ला बू. शाळेची नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यासह देशाला दिशा देणारी आहे, असे उद्गार लातूरच्या तत्कालीन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अभिमानाने व्यक्त केले होते, अशी आठवण मुंडकर यांनी आपल्या मनोगतात सांगितली.



महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, तालुका शाखा बिलोलीने गेल्या पाच-सहा वर्षांपासून कार्ला बू. येथील शाळा दत्तक घेतली आहे. या माध्यमातून शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. मात्र केवळ वृक्ष लावून फोटो काढणे हा उद्देश न ठेवता वृक्ष जगविणे, त्याची निगा राखणे आणि तो मोठा होताना पाहणे, हा संकल्प करण्यात आला.
यातूनच ‘वृक्षाचा वाढदिवस’ ही अभिनव संकल्पना पुढे आली. ज्याप्रमाणे आपल्या अपत्याचा वाढदिवस प्रेमाने साजरा केला जातो, त्याचप्रमाणे लावलेल्या वृक्षाचाही वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांबद्दल आत्मीयता आणि पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण केली जात आहे. या उपक्रमासाठी शिक्षक शिवराज बरबडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
मनोहर हणमंतराव शिरगिरे यांनी १६ डिसेंबर १९९५ रोजी खैरगाव तांडा, हिमायतनगर येथून आपल्या शैक्षणिक सेवेची सुरुवात केली. त्यानंतर डोनगाव बु., केसराळी आणि २४ जानेवारी २०१४ पासून कार्ला बू. येथे त्यांनी सेवा बजावली.

वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन, डिजिटल शाळा, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा विविध विषयांवर उपक्रमांतून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी शिरगिरे सरांच्या कन्येने मनोगत व्यक्त करताना आपल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “आमच्या आई-वडिलांमुळे आम्ही घडलो, वाढलो आणि आज स्वतःच्या पायावर उभे आहोत. त्यांच्या संस्कारांमुळे आम्हाला आयुष्यात यश मिळाले असून याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो,” असे भावपूर्ण उद्गार तिने काढले. सत्काराला उत्तर देताना मनोहर शिरगिरे भावुक झाले. आपल्या प्रदीर्घ सेवाप्रवासाचे श्रेय त्यांनी पत्नीला, विद्यार्थ्यांना आणि विविध गावांतील नागरिकांना दिले.
ते म्हणाले, “माझ्या पत्नीच्या त्यागामुळे मी यशस्वीरित्या शिक्षकी पेशा सांभाळू शकलो. माझ्या सेवाकाळात ज्या-ज्या गावात मी सेवा केली, त्या त्या गावातील नागरिकांनी व गावकऱ्यांनी मला अनमोल सहकार्य दिले. विशेष म्हणजे माझ्या सेवेची समाप्ती माझ्या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कार्ला बू. येथून होत आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे.”
“माझ्या जीवनात मी जे काही घडलो, त्यामागे माझ्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद आहे,” असे सांगत त्यांनी सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, सहकारी शिक्षक आणि हितचिंतकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना अभियंता श्रीपाद पाटील म्हणाले, “शिरगिरे सरांचे योगदान आमच्या चिमुकल्यांच्या सदैव आठवणीत राहील. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले संस्कार हे शाळेची कायमची शिदोरी आहे.”
या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी गणेशराव नागनाथराव पाटील मरखले-शिंपाळकर, शिक्षण क्षेत्रातील राज्य पुरस्कारप्राप्त नेतृत्व जयवंतराव काळे, कार्ला बू. मा. सरपंच शिल्पाताई शिवराज खेळगे, शिवराज पाटील खेळगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराज मारोतराव मेडगुळे, कार्ला बू. च्या पोलीस पाटील वर्षाताई गजानन जामनोर, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा बिलोलीचे मुख्याध्यापक अनिल विठ्ठलराव रायकंटवार, हुंसा गावचे सरपंच शिवकुमार सोमन्ना मरखले, माजी सरपंच शिवराज घाळप्पा शिरगिरे उपस्थित होते.
याशिवाय येसगीचे माजी सरपंच गंगाधरराव प्रचंड, मार्केट कमिटीचे संचालक आनंदराव बिरादार, कार्ला बू. चे माजी सरपंच राजेंद्र पाटील, शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष संजय गंजगुडे, अखिलचे तालुकाध्यक्ष श्रीकांत मिनके, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव हासगुळे, रमेश गायकवाड, राजाराम कसलोड, शिवराज गागीलगे, शिवराज अपराजे, शशिकलाताई सोमपूरे, शारदाताई कनशेट्टे यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक तसेच शिरगिरे कुटुंबीय व नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज बरबडे, प्रास्ताविक बालाजी गेंदेवाड तर आभार प्रदर्शन श्रीकांत मिनके यांनी केले. गावकऱ्यांच्या, नातलगांच्या व केंद्रातील शिक्षकांच्या वतीने मनोहर शिरगिरे सरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्ला बू. येथील ग्रामस्थ तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
आनंददायी आणि भावपूर्ण वातावरणात, जुन्या आठवणींना उजाळा देत मनोहर शिरगिरे यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला कृतज्ञतापूर्वक सलाम करत हा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला.
