
ग्रामसभेत मंजूर यादीचे वाचन; ग्रामपंचायत अधिकारी नारायण काळे यांचा सत्कार
हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर तालुक्यातील कारला पिचोंडी येथे अनेक वर्षांपासून घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंचायत समितीमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या २६३ लाभार्थ्यांच्या यादीचे ग्रामसभेत वाचन करण्यात आले.



गावातील पात्र वंचित लाभार्थ्यांचे ग्रामपंचायत अधिकारी नारायण काळे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानंतर पंचायत समितीकडून २६३ लाभार्थ्यांची मंजूर यादी ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाली. ग्रामसभेत ही यादी ग्रामस्थांना वाचून दाखवून घरकुल योजनेबाबत आवश्यक माहिती देण्यात आली.



यावेळी प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, मोदी आवास योजना, मनरेगा तसेच गावातील मूलभूत सुविधा आणि विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. उर्वरित पात्र लाभार्थ्यांचेही सर्वेक्षण करून त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


दरम्यान, गावातील विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी नारायण काळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामविकास अधिकारी आनंद कदम यांचाही सत्कार करण्यात आला.


सत्काराला उत्तर देताना नारायण काळे म्हणाले, “गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यानेच गावाचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो.”
ग्रामसभेचे अध्यक्ष रामजी मिराशे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ. गफार कार्लेकर, भीमराव पाटील, आनंद सूर्यवंशी, दत्ता चिंतलवाड, भगवान रासमवाड, गजानन मिराशे, अशोक चप्पलवाड, अशोक आचमवाड, वसंत मिराशे, शिवाजी एटलेवाड, सोपान बोंपीलवार, जांबुवंत मिराशे, लक्ष्मण ढाणके, आनंद रासमवाड, साहेबराव घोडगे, नागसेन गोखले, वैजनाथ यमजलवाड, कैलास कांबळे, जनार्दन मुठेवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
