वटफळी ग्रामपंचायतीचा कारभार ‘रामभरोसे’! राष्ट्रध्वज स्थळासमोरच घाणीचा बाजार

१५ ऑगस्ट तोंडावर; रस्त्यावर चिखल-पाणी, नाल्या तुंबल्या, RO फिल्टर असूनही ग्रामस्थ तहानलेले — वर्षभर तक्रारी करूनही प्रशासन सुस्त

हिमायतनगर, अनिल मादसवार| देशभर स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असताना हिमायतनगर तालुक्यातील वटफळी गावात मात्र राष्ट्रध्वज स्थळासमोरच अस्वच्छता, चिखल आणि साचलेल्या पाण्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. गावातील मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील व गावाकऱ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

राष्ट्रध्वज फडकविण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवता येत नसेल, तर ग्रामपंचायतीचा कारभार नेमका चालतो तरी कसा? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

वटफळी येथील मुख्य रस्त्यावर पावसाचे व सांडपाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्या तुंबलेल्या असून पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना अक्षरशः चिखलातून वाट काढावी लागत आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असतानाही कायमस्वरूपी निचरा व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना का करण्यात आली नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

१५ ऑगस्टला विद्यार्थ्यांना घाणीच्या रस्त्यावरूनच प्रभात फेरी?

१५ ऑगस्ट रोजी विद्यार्थी प्रभात फेरी काढून याच राष्ट्रध्वज स्थळी पोहोचणार आहेत. मात्र राष्ट्रध्वज स्थळाच्या परिसरात घाण, चिखल आणि पाणी साचलेले असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाला सलाम करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रशासन घाणीच्या साम्राज्याने करणार का? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.

मागील वर्षीही याच समस्या होत्या. त्या वेळीही प्रश्न उपस्थित करण्यात आला; मात्र वर्षभरात परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आश्वासनांचे काय झाले? निधी असेल तर कामे कुठे झाली? आणि कामे झाली नसतील तर जबाबदार कोण? असे सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

RO प्लांट असूनही पाण्यासाठी वणवण!

गावात ARO/RO फिल्टरची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याचा नियमित लाभ ग्रामस्थांना मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेली पाणीशुद्धीकरणाची यंत्रणा ग्रामस्थांच्या उपयोगाची की केवळ दाखविण्यासाठी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. फिल्टरची तांत्रिक तपासणी करून तो नियमित सुरू ठेवावा आणि ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल, याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नाल्या तुंबल्या, अतिक्रमण वाढले; जबाबदार कोण?

गावातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. सार्वजनिक रस्ते, नाल्या आणि शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का? की सामान्य नागरिकांपुरतीच नियमांची अंमलबजावणी? असा सवालही नागरिकांमधून केला जात आहे.

निवेदनांचा पाऊस; प्रत्यक्ष काम मात्र शून्य?

या सर्व समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, वटफळीकर यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्हा व तालुका प्रशासनाकडे निवेदन देऊन तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, हिमायतनगर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

मात्र आता ग्रामस्थांचा सवाल स्पष्ट आहे की, निवेदन घेऊन फाईल दाबून ठेवायची की प्रत्यक्ष गावात उतरून समस्या सोडवायच्या?१५ ऑगस्टपूर्वी राष्ट्रध्वज स्थळाची स्वच्छता, मुख्य रस्त्यावरील चिखल व जलजमाव दूर करणे, नाल्यांची साफसफाई, पाण्याचा कायमस्वरूपी निचरा आणि RO फिल्टर सुरू करणे आवश्यक आहे.

वर्षभर समस्या कायम ठेवणाऱ्या संबंधितांची जबाबदारी निश्चित करून चौकशी करावी आणि केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने वटफळी येथे पाहणी करून कार्यवाही न केल्यास मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी भूमिका ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!