
हिमायतनगर परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण



हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातून गेलेल्या धानोडा भोकर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील कथित निकृष्ट दर्जाचा कारभार आता नागरिकांच्या आरोग्यावर बेतू लागला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले नाले अल्पशा पावसातच फेल ठरत असून, नाल्यांतील घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट शहरातील सखल वस्त्यांमध्ये घुसत आहे. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेसह गंभीर आरोग्य धोक्याचा सामना करावा लागत आहे.



शहराच्या दोन्ही बाजूंना बांधण्यात आलेल्या नाल्यांमध्ये पाण्याचा उतार, नैसर्गिक प्रवाह आणि जलनिस्सारणाचा कोणताही शास्त्रीय विचार न करता मनमानी पद्धतीने काम करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते उलट वस्त्यांमध्ये साचत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.


विशेष म्हणजे, याच निकृष्ट कामाविरोधात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आवाज उठविला होता. त्यावेळी संबंधित अभियंता देशपांडे यांनी कामात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा न करता काही ठिकाणी सब-कॉन्ट्रॅक्टरमार्फत मनमानी पद्धतीने काम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अनेक भागात नाल्यांची कामे अर्धवट सोडण्यात आल्याने नागरिकांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत.


दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संतापाची लाट पसरली आहे.
नागरिकांनी संबंधित ठेकेदार, कामावर देखरेख करणारे अभियंते आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच नाल्यांतील त्रुटी तातडीने दूर करून साचलेल्या घाण पाण्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग विभाग, संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अभियंत्यांविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कोट्यवधींचा खर्च… पण शहरवासीयांच्या वाट्याला घाण पाणी आणि दुर्गंधी! अखेर या निकृष्ट कामाला जबाबदार कोण? हा प्रश्न आता हिमायतनगरकरांकडून उपस्थित केला जात आहे.
