
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मांडले विकासाचे मुद्दे
नांदेड /हिंगोली, अनिल मादसवार| राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या समवेत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मंगळवारी (दि. १४ जुलै) नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेत हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत.



बैठकीत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज उच्च शिक्षण संस्था (विद्यापीठ) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत (PMGSY) प्रलंबित व नवीन रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली.



मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे थांबे मंजूर करावेत, हिंगोली शहरात विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधी द्यावा, तसेच घरकुल, पाणीपुरवठा, गोठा अनुदान आणि इतर केंद्र पुरस्कृत विकास योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.


अलीकडे मतदारसंघात जाणवलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सिस्मोग्राफ (भूकंपमापक) यंत्रणा तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच भूकंपप्रवण भागातील नागरिकांसाठी घरकुल योजनेचे अनुदान वाढवावे आणि जीर्ण व धोकादायक घरांच्या जागी पक्की घरे उभारण्यासाठी विशेष मदत द्यावी, अशी मागणी खासदार आष्टीकर यांनी केली.


याशिवाय उमरखेड–महागाव परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेल्या खरीप २०२५ पीक विम्याप्रकरणी केंद्र सरकारकडील संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक कार्यवाही करता येईल, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी, वाहतूक, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
