नांदेड पोलिसांचा धाडसी छापा; ३७ प्रकारची प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने जप्त

नांदेड| भारतात विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांच्या मोठ्या साठ्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ३७ ते ३८ प्रकारची प्रतिबंधित उत्पादने जप्त केली आहेत. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली असून, यामुळे अवैध सौंदर्य प्रसाधनांच्या व्यापाराचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Oplus_16908288

नांदेड पोलिसांनी ‘अफ्रा जनरल स्टोअर्स’ या दुकानावर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने आढळून आली. प्राथमिक अंदाजानुसार जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ५० ते ६० लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

जप्त केलेल्या उत्पादनांमध्ये आरोग्यास घातक ठरू शकणारे घटक असल्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या मदतीने नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दुकानाच्या मालकाला ताब्यात घेतले असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित माल कोठून आणला गेला, त्याची पुरवठा साखळी काय आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे प्रतिबंधित परदेशी उत्पादनांच्या अवैध विक्रीवर पोलिसांनी मोठा आळा घातल्याचे मानले जात असून, तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!