जनजागृतीसाठी माध्यमांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

एसआयआर प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही
नांदेड | भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यात मतदार पडताळणीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. माध्यमांनी या मोहिमेची व्यापक जनजागृती करून नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी राजकुमार माने तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, 30 जूनपासून बूथस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन गणना पत्रके भरत असून, सर्व पात्र मतदारांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन या मोहिमेला सहकार्य करावे. 2002 च्या विशेष पुनरिक्षणात समाविष्ट असलेल्या मतदारांना केवळ माहितीची पडताळणी करून गणना पत्रक सादर करायचे आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यात 3,088 बीएलओ, 310 बीएलओ पर्यवेक्षक, 90 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि 9 मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, गरजेनुसार अतिरिक्त बीएलओंचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांनी 10,909 बूथस्तरीय एजंट (BLA) नियुक्त केले आहेत.

गणना पत्रकाचे डिजिटायझेशन करताना तांत्रिक अडचणी आल्यास मतदारांनी घाबरून न जाता संबंधित बीएलओशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन गणना पत्रक भरण्याची सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

यापूर्वी झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे कायम ठेवली जातील, तर मृत, दुबार किंवा स्थलांतरित मतदारांची नावे नियमानुसार वगळण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले. डिजिटायझेशनदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी बीएलओ मार्फत तातडीने सोडविण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!