
‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून हरित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल
नांदेड, अनिल मादसवार| हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान, वन महोत्सव २०२६ आणि ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत नांदेड रेल्वे परिसरात तब्बल ५१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधत सामाजिक वनीकरण विभाग, नांदेड आणि मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी वन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.


विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा उपक्रम विभागीय वन अधिकारी संदीप चव्हाण आणि सहाय्यक वनसंरक्षक नितेश निघडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.



यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कल्याण राजू, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. एम. के. श्रीनिवासा, तसेच रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश लख्खेकर उपस्थित होते.



वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश लख्खेकर यांनी सांगितले की, यंदाच्या वन महोत्सवानिमित्त रेल्वे परिसरात ३५ ते ४० विविध प्रजातींच्या सुमारे ५१ हजार वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड केली जाणार आहे.



या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे रेल्वे परिसर अधिक हिरवागार होण्यास, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळण्यास आणि जैवविविधतेच्या जतनास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
