
जिल्हा परिषदेत कृषी दिन उत्साहात साजरा; पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव


नांदेड| शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती अधिक उत्पादनक्षम करावी. तसेच पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या जोड व्यवसायांची सांगड घालून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले.


कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पंचायत समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कै. वसंतराव नाईक जयंती आणि कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संदीप माळोदे बोलत होते.


यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पूनम पवार, कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अरविंद पंडागळे, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणकर, डॉ. शिवाजी शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया वायवळ आणि आत्माचे उपविभागीय कृषी अधिकारी गुंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी माळोदे यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी व पूरक योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले.केंद्र शासनाच्या ‘खेती बचाओ – धरती बचाओ’ अभियानांतर्गत जिल्हाभर जनजागृती सुरू असल्याचे सांगताना डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. व्यापक जनजागृतीमुळे जिल्ह्यात अद्याप सुमारे ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली नसल्याने दुबार पेरणीचे संकट टळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कृषी विज्ञान केंद्रात माती व पाणी परीक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देत शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार त्याचा लाभ घ्यावा, असे सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर करावा आणि जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊनच पेरणी करावी, असे आवाहन केले. मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे ९०० कोटी रुपयांचा पीक विम्याचा लाभ मिळाल्याची माहिती देत, यंदा हळद पिकाचाही पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ जुलै असल्याचे त्यांनी सांगितले.

गावनिहाय व्हॉट्सॲप गटांच्या माध्यमातून कृषीविषयक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात असल्याचे सांगत त्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यात ९०० शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक गावात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कपाशीचे उत्पादन वाढविण्यासाठी ३ बाय १.५ फूट अंतरावर लागवड करून रोपांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात सुमारे ५ लाख १०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होत असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पीक नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन करत त्यांनी स्वतः रचलेली जनजागृतीपर कविता सादर केली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. अरविंद पंडागळे आणि डॉ. माधुरी रेवणकर यांनीही आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रगतिशील शेतकरी तसेच बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील लाभार्थ्यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सन २०२५ च्या खरीप हंगामातील पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सोयाबीन, मुग, उडीद, मका आणि तूर या पिकांतील जिल्हास्तरीय विजेत्यांना गौरविण्यात आले.
