नरसीप्रमाणे बिलोलीतही अतिक्रमण हटवा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

उपविभागीय अधिकाऱ्यांना नागरिकांचे निवेदन; प्रशासनाच्या दिरंगाईवर संतप्त सवाल

बिलोली, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील नरसी (नायगाव) येथे अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने राबविलेल्या प्रभावी कारवाईच्या धर्तीवर बिलोली शहरातील वाढते अतिक्रमणही तातडीने हटविण्यात यावे, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, बिलोली यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बिलोलीतील जुने पंचायत समिती कार्यालय, नवीन पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्ता तसेच शहरालगतच्या मालगुजारी (वमन) तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून, त्यामुळे वाहतूक, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होत आहे. अनेकवेळा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

नागरिकांनी यापूर्वी तहसीलदारांना अनेक वेळा निवेदने देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने केवळ आश्वासनांची पूर्तता केली असून प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्याबाबत कोणतीही प्रभावी मोहीम राबविलेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांची गैरसोय वाढत आहे. दुसरीकडे मालगुजारी तलाव परिसरातील अतिक्रमणामुळे सार्वजनिक जागेचे अस्तित्व धोक्यात आले असून भविष्यात पर्यावरणीय व नागरी समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

“नरसी येथे अतिक्रमण हटविता येते, मग बिलोलीत का नाही? प्रशासनाकडे अधिकार नाहीत की कारवाई करण्याची इच्छाशक्ती नाही?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असावी, काही ठिकाणी कठोर कारवाई आणि काही ठिकाणी मौन, ही भूमिका नागरिकांना मान्य नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, बिलोलीतील अतिक्रमण तातडीने हटविण्यात आले नाही, तर नागरिक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर एम. एम. जाधव, अर्जुनराव पिलाजी अंकुशकर, शंकरराव पिलाजी अंकुशकर, शिवराज रायलवाड, लिंगराम एडके, कुलदीप चौहान, बालाजी ठक्करवाड, डॉ. मनोज शेंघापळे, अॅड. कुलकर्णी यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आता उपविभागीय प्रशासन या निवेदनाची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि नरसीप्रमाणेच बिलोलीतही अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविते का, याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!