ज्येष्ठ कलावंत व साहित्यिकांसाठी सुवर्णसंधी; मानधन सन्मान योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा

राजर्षी शाहू महाराज योजनेचा लाभ घेण्याचे बाबूराव पाटील यांचे आवाहन
भोकर | राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज वयोवृद्ध ज्येष्ठ कलावंत व साहित्यिक मानधन सन्मान योजने’ अंतर्गत सन २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र ज्येष्ठ कलावंत, साहित्यिक आणि लोककला जतन करणाऱ्या कलाकारांनी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून या सन्माननीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अशासकीय सदस्य तथा कलावंत-साहित्यिक बाबूराव पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (निवड समिती अध्यक्ष) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी (सचिव) यांनीही पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या योजनेसाठी अर्जदाराचे किमान वय ५० वर्षे, तर दिव्यांग कलाकारांसाठी ४० वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹६० हजारांपर्यंत असावे. अर्जासोबत उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, संयुक्त छायाचित्र, प्रतिज्ञापत्र, दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास), सांस्कृतिक कार्यक्रमांतील सहभागाचे पुरावे, शिफारसपत्र तसेच कलाविषयक वृत्तपत्रांच्या कात्रणांसह आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

या योजनेचा लाभ लोककलावंत, गोंधळी, भारूडकार, वासुदेव, शाहिरी प्रबोधनकार, नाट्यकलावंत, साहित्यिक, कवी, कीर्तनकार, गायक, वादक आदी विविध कला क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांना मिळणार आहे. “राज्य शासनाच्या या सन्माननीय योजनेचा जास्तीत जास्त पात्र कलावंत आणि साहित्यिकांनी लाभ घ्यावा,” असे आवाहन बाबूराव पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!