हिमायतनगर तालुक्यात बोगस खत विक्रीचा संशय; शेतकऱ्यांनी सतर्क राहावे – वामनराव वडगावकर

ब्रँडेड नावाखाली बनावट खत विक्री? कृषी विभागाने चौकशी करावी अशी मागणी

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुका आणि शहर परिसरात काही ठिकाणी बोगस व निकृष्ट दर्जाच्या खतांची विक्री होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत असून शेतकरी बांधवांनी खत खरेदी करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी केले आहे.

हिमायतनगर शहरातील काही कृषी बी -बियाणे व खत विक्रेते नामांकित आणि ब्रँडेड कंपन्यांच्या नावाखाली संशयास्पद खतांची विक्री करत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच पिकांच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वामनराव वडगावकर यांनी शेतकऱ्यांना खत खरेदी करताना खताच्या पोत्यावरील कंपनीचे नाव, बॅच नंबर, उत्पादनाची माहिती आणि सील यांची काळजीपूर्वक तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच खत खरेदीची अधिकृत पावती घेणे, खताची गुणवत्ता संशयास्पद वाटल्यास त्याचा नमुना जतन करणे आणि वापरण्यापूर्वी त्याची खात्री करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलेल्या माहितीनुसार, काही खतांमध्ये मातीसदृश पदार्थ मिसळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतेही खत वापरण्यापूर्वी त्याची शहानिशा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेते व संबंधितांवर कृषी विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही वडगावकर यांनी केली आहे. शेतकरी हिताच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकरी बांधवांनी सतर्क राहून संशयास्पद खत विक्रीची माहिती कृषी विभाग किंवा संबंधित प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

“गतवर्षी हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस खताचा साठा पकडण्यात आला होता. त्यामुळे यंदाही अशाच प्रकारे बोगस खत, बियाणे आणि खतांची हेराफेरी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांकडून वारंवार तक्रारी येत असताना कृषी विभागाचे गुणनियंत्रण पथक नेमके काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही ठिकाणी जादा दराने खत विक्री, बोगस खतांचा पुरवठा आणि नियमबाह्य व्यवहार सुरू असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी स्वतः लक्ष घालून हिमायतनगर तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवावी व दोषींवर कठोर कारवाई करावी.” अशी मागणी शेतकरी व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!