
नांदेड | जलसंधारणाच्या कामातून पर्यावरण संवर्धनासह शाश्वत उत्पन्नाचा मार्ग कसा निर्माण होऊ शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण लोहा तालुक्यातील शेतकरी बालाजी कोटगीरे यांनी उभे केले आहे. त्यांच्या शेतावरील अभिनव ‘बांबू बेट’ प्रकल्पाची जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि या प्रयोगाची सविस्तर माहिती घेतली.


सन २०२३ मध्ये उन्हाळ्यात कोटगीरे यांनी आपल्या शेतातील नाल्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण केले. सुमारे ५०० फूट लांबी, ५ फूट खोली आणि ८ फूट रुंदी असलेल्या नाल्यातून काढलेली माती दोन्ही बाजूंना टाकण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात ही माती पुन्हा नाल्यात वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता.


या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्यांनी नाल्याच्या दोन्ही काठांवर ५ बाय ५ फूट अंतरावर आलोव्हेरी जातीच्या बांबूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आलेल्या या लागवडीसाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था उभारण्यात आली. नियमित पाणीपुरवठा आणि योग्य व्यवस्थापनामुळे बांबूची वाढ अत्यंत वेगाने झाली.


अवघ्या तीन वर्षांत प्रत्येक बांबू बेटामध्ये १५ ते २० काठ्यांची वाढ झाली असून बांबूची उंची २० ते २५ फूट आणि जाडी २ ते २.५ इंचांपर्यंत पोहोचली आहे.


या उपक्रमामुळे नाल्याचे बांध सुरक्षित राहिले, मातीची धूप थांबली, शेतातील सुपीक माती वाहून जाण्यापासून बचाव झाला तसेच अनावश्यक झुडपे व गवताच्या वाढीलाही आळा बसला. परिणामी जलसंधारणाचा उद्देश साध्य होण्याबरोबरच बांधावर दीर्घकालीन उत्पन्नाचे साधनही निर्माण झाले आहे.

शेतकरी बालाजी कोटगीरे यांच्या मते, १५० बांबू रोपांमधून भविष्यात दरवर्षी सुमारे १५०० बांबू काठ्यांचे उत्पादन मिळू शकते. प्रति काठी सरासरी ४० रुपये दर गृहीत धरल्यास वार्षिक सुमारे ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे, बांबू लागवडीच्या पाच वर्षांनंतर हे उत्पन्न पुढील ५० ते ८० वर्षांपर्यंत सातत्याने मिळू शकते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी या अभिनव प्रयोगाचे कौतुक करत जलसंधारण आणि उत्पन्नवाढ यांचा उत्तम संगम साधणाऱ्या अशा उपक्रमांचा इतर शेतकऱ्यांनीही आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले.
