
भाजप प्रवेशाच्या चर्चांना जवळगावकरांचा ब्रेक; “मी काँग्रेसमध्येच, अफवांवर विश्वास ठेवू नका”
हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेत असतानाच जवळगाव येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत, “मी काँग्रेस पक्षामुळेच आज या स्थानावर पोहोचलो आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही,” अशी भूमिका मांडली.


जवळगाव येथे झालेल्या बैठकीत तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर आपली मते व्यक्त केली. काहींनी जवळगावकर यांनी काँग्रेसमध्येच राहून नेतृत्व करावे, अशी मागणी केली, तर काहींनी बदलत्या राजकीय परिस्थितीत विकासासाठी नवीन पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला दिला.


मात्र या सर्व चर्चांवर भाष्य करताना जवळगावकर म्हणाले, “माझी ताकद पक्षांतरात नाही, तर जनतेच्या विश्वासात आहे. मतदारसंघातील जनतेने आणि कार्यकर्त्यांनी मला आजपर्यंत साथ दिली. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्यांची भावना महत्त्वाची राहील. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”


विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून जवळगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले होते. त्यातच विविध स्तरांवर सुरू असलेल्या बैठका आणि संपर्क मोहिमांमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले होते. मात्र जवळगाव येथील बैठकीत त्यांनी थेट भूमिका स्पष्ट केल्याने कार्यकर्त्यांमधील संभ्रम काही प्रमाणात दूर झाल्याचे दिसून आले.


दरम्यान, येत्या काळात हदगाव येथे आणखी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, विकासकामे आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात जवळगावकरांची राजकीय रणनीती नेमकी काय असणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. हदगाव-हिमायतनगरच्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चांदरम्यान जवळगावकरांनी काँग्रेसप्रती निष्ठा व्यक्त केल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
“कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेणार” — माधवराव पाटील जवळगावकर
“काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठपणे पार पाडली आहे. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत मतदारसंघाचा विकास, जनतेची कामे आणि कार्यकर्त्यांचे भविष्य लक्षात घेऊन पुढील दिशा ठरविणे आवश्यक झाले आहे. कोणताही निर्णय एकट्याने घेणार नाही, तर दोन्ही तालुक्यांतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेला विश्वासात घेऊनच पुढील राजकीय भूमिका निश्चित करणार. कार्यकर्त्यांच्या भावना आणि मतांचा आदर राखतच भाजप पक्ष प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.”
