
नांदेड | सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा-2026 अंतर्गत पीक उत्पादनवाढ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने श्री पंचमुखी शेतकरी गट, कासारखेडा आणि अन्नपूर्णा महिला शेतकरी गट, सिद्धनाथ यांच्या सदस्यांनी नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राला भेट देत सोयाबीन पिकातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन घेतले.


महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शेतकऱ्यांना सोयाबीन पीक स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या विविध मानक कार्यपद्धती (SOP) आणि उत्पादनवाढीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.


यावेळी कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. बसवराज भेदे, डॉ. पवन ढोके, प्रगतशील शेतकरी गुलाब पावडे, सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर वसंत जारिकोटे आणि कैलास पेरके यांची प्रमुख उपस्थिती होती.


डॉ. अरविंद पांडागळे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, हळद व कापूस लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. बसवराज भेदे यांनी सोयाबीन पिकातील प्रमुख किडींची ओळख, त्यांचा जीवनक्रम आणि प्रभावी व्यवस्थापन पद्धती याविषयी माहिती दिली. तर डॉ. पवन ढोके यांनी विविध रोगांचे निदान, प्रतिबंधात्मक उपाय आणि जैविक घटकांच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले.


प्रगतशील शेतकरी गुलाब पावडे यांनी शेवगा लागवड, त्यापासून तयार होणारी मूल्यवर्धित उत्पादने आणि शेतीपूरक उद्योगांच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विविध पिकांबाबतचे प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून समाधानकारक उत्तरे मिळवली.

या प्रशिक्षणाचे नियोजन आणि समन्वय साधण्यासाठी मेंटॉर वसंत जारिकोटे आणि कैलास पेरके यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत जारिकोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कैलास पेरके यांनी केले.
या अभ्यासदौर्यास दोन्ही गटांचे निमंत्रक शिवदास कडेकर आणि जयश्री आवातीरकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. मार्गदर्शन सत्र अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त करत, मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढ साध्य करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
