
जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत निर्णय फेरविचाराची मागणी; नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त


उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावावरून नवा वाद


हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी (उपजिल्हाधिकारी) कार्यालय किनवट येथे स्थापन करताना हदगाव व हिमायतनगर तालुके किनवटला जोडण्याच्या निर्णयास खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात त्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.


खासदार आष्टीकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासनाने नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी दिल्याबद्दल स्वागत असले तरी हदगाव व हिमायतनगर तालुके किनवटला जोडणे सर्वसामान्य जनतेसाठी गैरसोयीचे व अडचणीचे ठरणार आहे. याबाबत नागरिक, व्यापारी संघटना तसेच विविध घटकांकडून तक्रारी प्राप्त झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


पत्रानुसार, २०२५ पूर्वी स्वतंत्र एसडीओ कार्यालय सुरू होण्यापूर्वी हदगाव-हिमायतनगर हा भाग किनवटशी जोडलेला होता. मात्र प्रमाणपत्रे, न्यायनिवाडे व प्रशासकीय कामकाजासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे नंतर हदगाव येथे एसडीएम कार्यालय मंजूर करण्यात आले होते. तसेच, हदगाव ते किनवट अंतर अधिक असून वाहतूक सुविधाही मर्यादित आहेत, तर नांदेड येथे जिल्हा प्रशासन, न्यायालय, पोलीस प्रशासन व इतर महत्त्वाची कार्यालये उपलब्ध असल्याने नागरिकांना कामकाज सुलभ होते, असा मुद्दाही खासदारांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे प्रस्तावित किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयास हदगाव-हिमायतनगर भाग न जोडता पूर्ववत व्यवस्था कायम ठेवावी, अशी मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
