
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागावर नागरिकांची नाराजी
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे सरसम नजीक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


“रस्ता रुंद झाला, पण अपघातांचे सत्र कधी थांबणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या मते, महामार्ग रुंदीकरणानंतर या मार्गावरील वाहनांचा वेग वाढला असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना अद्याप अपुऱ्या आहेत. परिणामी, वारंवार अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.


सोशल मीडियावर व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रियांमध्ये अनेकांनी वेदना मांडत म्हटले आहे की, या रस्त्याने अनेक कुटुंबांचे आधार हिरावून घेतले आहेत. अनेक महिलांनी पती गमावले, मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले, तर अनेक मातांच्या काळजाचा तुकडा कायमचा दूर गेला. दररोज अपघातांच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर टोल वसुली होत असताना सुरक्षिततेच्या मूलभूत सुविधा मात्र दिसत नाहीत. योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर, डिव्हायडर, इशारा फलक, वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि अपघातप्रवण ठिकाणांवर विशेष उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


यामुळे लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभाग गंभीर का होत नाहीत? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याबाबत संताप वाढत आहे. नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने रस्त्यावरील सुरक्षेचा आढावा घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा निष्पाप नागरिकांचे बळी असेच जात राहतील, अशी तीव्र भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर उमटणाऱ्या या प्रतिक्रिया प्रशासनासाठी इशारा मानल्या जात असून, संबंधित यंत्रणा आणि राजकीय नेतृत्व याबाबत किती गंभीर भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“हिमायतनगर ते नांदेड हा दररोज हजारो नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांचा प्रवासाचा मार्ग आहे. मात्र रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भेगा, अपूर्ण दुरुस्ती आणि गाव-फाट्यांजवळ स्पीड ब्रेकर किंवा डिव्हायडर नसल्याने हा महामार्ग आता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. शासनाने कोट्यवधी खर्च करून रस्ता केला, देखभालीसाठी निधीही दिला; पण प्रत्यक्षात सुरक्षिततेच्या उपाययोजना दिसत नाहीत. रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे,” असे वाहनधारक व प्रवासी संतापाने बोलून दाखवत आहेत.
