
हिमायतनगर | सरसम ते हिमायतनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पुन्हा एकदा भीषण अपघात घडून एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर नामेवार व लक्षटवार हे सरसम येथून हदगाव तालुक्यातील वाळकी व तामसा गावाकडे मोटारसायकलने जात होते. त्याचवेळी समोरून वाळकेवाडी येथील क्षीरसागर लक्ष्मणराव हे ऑटो घेऊन येत असताना रस्त्यावरील भेगांमध्ये दुचाकी अडकल्याने मोटारसायकल घसरली व थेट ऑटोला जाऊन धडकली.


या भीषण अपघातात गंगाधर नामेवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऑटोचालक क्षीरसागर लक्ष्मणराव व दुचाकीवरील लक्षटवार हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सरसम येथील नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेत जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र, सरसम येथे दाखल केले.



दरम्यान, सरसम–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर स्पीड ब्रेकर, डिव्हायडर व इतर सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.



महामार्गाचे काम अद्याप अर्धवट असताना वारंवार होणारे अपघात आणि मृत्यूचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. “राष्ट्रीय महामार्ग विभाग आणखी किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, टोल वसुलीवर भर देणाऱ्या यंत्रणांनी नागरिकांच्या सुरक्षेकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
