एसबीआयच्या लॉकरमधून ८० तोळे सोने गायब; ग्राहकांचा विश्वास तुटला

नांदेडच्या डॉक्टर लेन शाखेत धक्कादायक घोटाळा; एक अधिकारी अटकेत, दुसरा फरार

नांदेड | देशातील सर्वात विश्वासार्ह बँकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नांदेड येथील डॉक्टर लेन शाखेत ग्राहकांचा विश्वास डळमळीत करणारा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. कर्जासाठी तारण ठेवलेले तब्बल ८० तोळे सोने दोन बँक अधिकाऱ्यांनी संगनमताने लंपास केल्याचा आरोप समोर आला असून, या घटनेने ग्राहकांसह शहरात एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रकार लपवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लॉकर मधील खरे सोने काढून त्याजागी बनावट सोने ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यामुळे बँकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि अंतर्गत नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर लेन शाखेत कर्जासाठी तारण ठेवण्यात आलेल्या सोन्यापैकी ८ ग्राहकांचे ३९१.६० ग्रॅम सोने, तसेच बँकेच्या ताब्यातील आणखी ४१४.३० ग्रॅम सोने अशा एकूण ८०५.९० ग्रॅम (सुमारे ८० तोळे) सोन्याची अफरातफर करण्यात आली. या सोन्याची अंदाजे किंमत ८५ लाख ८१ हजार ५९७ रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात शाखेतील कॅश इन्चार्ज आदित्य प्रकाश सेनगावकर आणि सर्व्हिस मॅनेजर जीवन माधवराव जगदाळे यांनी संगनमत केल्याचा आरोप आहे. हा प्रकार २७ जून २०२५ ते ११ मे २०२६ या कालावधीत घडल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.

शाखेचे मुख्य व्यवस्थापक राजीव अनंत कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जीवन जगदाळे याला तातडीने अटक केली असून, दुसरा आरोपी आदित्य सेनगावकर फरार असल्याने त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणामुळे “बँकेत ठेवलेले तारणही सुरक्षित नाही का?” असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात असून, नांदेडमधील बँकिंग व्यवस्थेवर चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!