डॉ. विकास सुकाळे यांची प्राचार्यपदी नियुक्ती; पीपल्स कॉलेजमध्ये पदग्रहण सोहळा उत्साहात

नांदेड | परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स कॉलेज, नांदेड येथील प्राचार्य पदाचा पदग्रहण सोहळा महाविद्यालयाच्या आयसीटी हॉलमध्ये शुक्रवारी उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. विकास सुकाळे यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील होते. यावेळी संस्थेच्या सचिव सौ. श्यामल पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर तसेच सौ. सुधा सुकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय समारोपात सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी पीपल्स कॉलेजच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक प्राचार्यपदी विराजमान झाल्याचे सांगितले. डॉ. विकास सुकाळे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात विकासपर्वाची सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संस्थेच्या सचिव सौ. श्यामल पत्की यांनी प्राचार्य पद हे नेतृत्वाचे पद असून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि संस्थेच्या ध्येय-धोरणांचा समतोल राखत निर्णय घेण्याची जबाबदारी असल्याचे सांगितले. डॉ. सुकाळे यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्राचार्य पद स्वीकारताना डॉ. विकास सुकाळे यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित, रोजगाराभिमुख आणि डिजिटल सक्षम शिक्षणव्यवस्था विकसित करण्याचा मानस व्यक्त केला. संस्थेने व विद्यापीठ समितीने दिलेल्या जबाबदारीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमास विविध मान्यवर, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भगवान जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विशाल पतंगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!