
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पर्जन्यमान घटण्याची शक्यता; जूनमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई | यंदाच्या मान्सून हंगामात महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. हवामान खात्याने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार देशात यंदा सरासरीच्या केवळ ९० टक्के पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये हा अंदाज ९२ टक्के होता. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


राज्यातील पर्जन्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून महिन्यात एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी राहील, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये हा प्रभाव अधिक तीव्र होऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


चार महिन्यांच्या मान्सून काळात पर्जन्यमानात घट झाल्यास शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, ऊर्जा निर्मिती आणि सार्वजनिक आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः खरिप हंगामातील पिकांवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


जूनमध्ये उष्णतेच्या लाटांची शक्यता
दरम्यान, जून महिन्यात राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचाही धोका असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. जून हा मान्सूनच्या संक्रमणाचा महिना मानला जातो. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण ४० ते ४५ दिवसांत तो राजस्थानपर्यंत पोहोचतो. मात्र, मान्सूनच्या प्रगतीला विलंब झाल्यास अनेक भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


