
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत डोके वर काढताना दिसत असून, वारंगटाकळी शिवारातील ताज्या घटनेने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.


सोमवारी मध्यरात्री वारंगटाकळी येथील शेतकरी आशिष ज्ञानेश्वर मोहिते यांच्या वासराचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली असून, या हल्ल्यामागे बिबट्याचा सहभाग असल्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी परिसरात भीतीचे सावट पसरले असून शेतकरी अक्षरशः दहशतीखाली वावरत आहेत.


काही महिन्यांपूर्वीही याच परिसरात बिबट्याने जनावरांवर हल्ले करत मोठी दहशत निर्माण केली होती. आता पुन्हा त्याच पद्धतीने पाळीव जनावरांवर हल्ले सुरू झाल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेतकरी रात्रभर शेतात जाण्यास धजावत नाहीत, तर मजूरही कामावर जाण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे.


उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने आणि पैनगंगा नदी पात्रात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय नसल्याने बिबट्यासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाण्याअभावी वन्य प्राणी शिवारात शिरत असल्याने केवळ जनावरेच नव्हे तर मानवी जीवितालाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


विशेष म्हणजे, पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडल्याचा गाजावाजा सोशल मीडियावर करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात नदी कोरडीच असल्याने वन्य प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर अशी परिस्थिती टळली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र केवळ सूचना देऊन भागणार नाही, तर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
“काल वासरावर हल्ला झाला, उद्या माणसावर झाला तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल परिसरातील शेतकरी उपस्थित करत आहेत. जून महिन्यात शेतीच्या कामांची धांदल सुरू होण्यापूर्वी वनविभागाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
