
लोहा तालुक्यात 60 विहीर-बोअर अधिग्रहण प्रस्ताव; अनेक गावांमध्ये टंचाई निवारणासाठी प्रशासनाची धावपळ
लोहा| कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही लोहा तालुक्यातील माळाकोळी आणि सावरगाव नसरत या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माळाकोळी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे 32 कोटी रुपयांची जलयोजना सुरू असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. तर सावरगाव नसरत येथे 23 कोटी रुपयांची योजना अर्धवट अवस्थेत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.


माळाकोळी गावाला पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी पूर्वी ग्रामस्थांनी स्मशानभूमीत उपोषण आंदोलन केले होते. त्यानंतर योजना मंजूर झाली, उद्घाटनही झाले; मात्र गावात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यानंतर चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निगराणीत 32 कोटी रुपयांची नवीन योजना मंजूर करण्यात आली. लिंबोटी धरणावर आधारित ही योजना संतोष कन्स्ट्रक्शनमार्फत राबविली जात आहे. मात्र कामाची गती मंद असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. गावात सध्या पाणीटंचाई निवारणासाठी सात बोअर अधिग्रहण प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.


सावरगाव नसरत येथेही लिंबोटी धरणावर आधारित 23 कोटी रुपयांची जलयोजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू आहे. गावासह परिसरातील वाडी-तांड्यांमध्ये पाण्याच्या टाक्या आणि पाइपलाइनचे काम अर्धवट अवस्थेत आहे. परिणामी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून काही भागात बोअर आणि विहिरी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


दरम्यान, लोहा तालुक्यात पाणीटंचाई निवारणासाठी पंचायत समितीकडे एकूण 60 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी 50 प्रस्ताव मंजुरीसाठी कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले असून उर्वरित प्रस्ताव पुढील दोन दिवसांत पाठविण्यात येणार आहेत. तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी कुलकर्णी तसेच संबंधित विभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून अधिग्रहण तपासणी केली जाणार आहे. तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक दीपिका डहाळे या प्रस्ताव मंजुरीस विलंब होऊ नये म्हणून तत्काळ वरिष्ठांकडे पाठवत असल्याची माहिती मिळाली आहे.



पाणीटंचाईग्रस्त गावांची यादी
तालुक्यातील माळाकोळी, सीताराम तांडा, जानापुरी, धनज खुर्द, कांजाळा तांडा, पिंपळगाव आयबी, केसू तांडा, वागदरवाडी तांडा, दापशेड, पिंपळदारी, गणातांडा, सावरगाव नसरत, नागदरवाडी, भेंडेगाव, पळशी, हरबळ, खेडकरवाडी, जवळा दे., हडोळी जहांगीर, रमनेवाडी, हुलायवाडी, मंजुतांडा, रामनाईक तांडा, वडगाव तांडा, कमळजगेवाडी, विठोबा तांडा आदी गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर झाली आहे.
मागील वर्षी अतिवृष्टी होऊनही जलसंधारण आणि “पाणी अडवा-पाणी जिरवा” उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम दिसून आला नसल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या योजना आणि प्रत्यक्षातील पाणीपुरवठा यामधील तफावत पुन्हा एकदा समोर आली आहे.
