
नांदेड | नांदेड येथील हजूर साहेब रेल्वे स्थानकावर गुरुवार दि. 21 मे रोजी सकाळी एका रिकाम्या रेल्वे डब्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. प्लॅटफॉर्म लाईनपासून काही अंतरावर उभ्या असलेल्या या रिकाम्या बोगीत आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. मात्र रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास हजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म लाईनपासून दूर उभ्या असलेल्या रिकाम्या डब्यातून धूर व आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ हालचाल करत अग्निशमन दल व संबंधित यंत्रणांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.


रेल्वे प्रशासनाने अवघ्या 45 मिनिटांत म्हणजे सकाळी 6.45 वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. सुदैवाने आग लागलेला डबा रिकामा असल्याने कोणतीही जीवितहानी अथवा प्रवाशांना दुखापत झालेली नाही.



दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात असली तरी नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेतला जात असून, पुढील तपास सुरू आहे.


