
नांदेड| नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेअंतर्गत पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत 2 लाख 47 हजार 9 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषी आढळल्यास दहा वर्षांच्या कारावासासह दंडाची तरतूद आहे.


नांदेड परिक्षेत्रात 1 ते 31 मे 2026 दरम्यान अवैध व्यवसाय विरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या 15 व्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. याशिवाय, मटका-जुगार खेळणाऱ्या व चालविणाऱ्या 10 इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये 6 गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 45 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


तसेच, अवैध दारू विक्री करणाऱ्या 27 इसमांविरुद्ध 24 गुन्हे दाखल करून 90 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात 2 गुन्हे दाखल करण्यात येऊन 46 लाख 11 हजार 802 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


या कारवाईसोबतच शस्त्र अधिनियमांतर्गत 3, कोटपा कायद्यान्वये 2, तसेच इतर अधिनियमांतर्गत मिळून एकूण 44 कारवाया करण्यात आल्या. या सर्व कारवायांमध्ये 61 इसमांविरुद्ध कारवाई करण्यात येऊन एकूण 65 लाख 71 हजार 426 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


नागरिकांना अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाइन (91 50 100 100) सुरू केली आहे. या हेल्पलाइनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, अवैध धंद्यांची माहिती फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे देण्याचे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
