
नांदेड| नांदेड जिल्ह्यात रविवारी, 17 मे 2026 रोजी होणाऱ्या JEE-Advanced 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.


ही परीक्षा सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार असून, जिल्ह्यातील खालील चार परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे :


आर.जी.जी. हायटेक डिजिटल झोन / राजीव गांधी कॉलेज कॅम्पस, विद्युत नगर, नांदेड
आय ऑन डिजिटल झोन, विष्णुपुरी, नांदेड
एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी संयोग कॅम्पस, नांदेड
श्री संभाजी कॉलेज ऑफ प्रायमरी शामल एज्युकेशन कॅम्पस, देगाव रोड समोर, नांदला दिग्रस खडकूत येथे होणार आहे.


आदेशानुसार, 17 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला जाणार नाही.


तसेच, परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरात कॅल्क्युलेटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ, लॅपटॉप व तत्सम साहित्य वापरण्यास किंवा जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स तसेच ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
