
हिमायतनगर, अनिल मादसवार| किनवट जिल्ह्यातील वाढोणा येथे विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत आयोजित दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. गोमाता पूजनाने वर्गाची सुरुवात करण्यात आली. अखिल भारतीय दुर्गावाहिनी सहसंयोजिका पिंकीदिदी पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यास प्रांत मंत्री योगेश्वरजी गर्गे, दुर्गावाहिनी प्रांत संयोजिका द्रौपदी गायकवाड, परमपूजनीय संत केशवानंद स्वामी, डॉ. दिगंबर डोंगरगावकर, वर्ग अधिकारी राधाताई धडे, जिल्हाध्यक्ष शामजी रायेवार, पूर्णकालीन छायाताई कांगणे तसेच जिल्हा मातृशक्ती संयोजिका सुनिताताई भंडारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

उद्घाटन सत्रात पिंकीदिदी पवार यांनी “विश्व हिंदू परिषद स्थापना आणि विस्तार” या विषयावर मार्गदर्शन करताना हिंदू समाज संघटनाची आवश्यकता, मातृशक्तीची भूमिका तसेच दुर्गावाहिनीच्या माध्यमातून राष्ट्रभक्त, संस्कारित आणि स्वाभिमानी युवती घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित भगिनींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

शौर्य, संस्कार, संघटन आणि राष्ट्रसेवा या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गात एकूण ६५ जणी सहभागी झाल्या असून त्यामध्ये ५० दुर्गा, १५ शिक्षिका आणि १ बालदुर्गेचा समावेश आहे. आत्मसंरक्षण, संघटन कौशल्य आणि सांस्कृतिक मूल्यांचा संगम असलेला हा वर्ग परिसरात विशेष आकर्षणाचा विषय ठरत असून भविष्यात समाजकार्य व राष्ट्रकार्यासाठी सक्षम मातृशक्ती घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
