पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग

नांदेड | नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. संबंधित गावांतील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

जलसंपदा विभागाने नागरिकांना कालवे व नाल्यांमधून बेकायदेशीर पाणी उपसा (पंपिंग) न करण्याचे तसेच पाण्याची नासाडी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्व गावांपर्यंत पाणी पोहोचविणे सोयीचे होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीटंचाई निवारणासाठी विभाग कटिबद्ध असून उर्वरित पाण्याचे नियोजन वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे.

३० मार्च २०२६ च्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यासाठी ३.०० दलघमी पाणी मंजूर करण्यात आले आहे. तर यवतमाळ जिल्ह्यासाठी ४.०० दलघमी आणि १ मे २०२६ च्या आदेशानुसार अतिरिक्त ५.०० दलघमी पाणी सोडण्यात आले आहे.

५ एप्रिलपासून विसर्ग सुरू
इसापूर धरणातून थेट पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र विमोचक नसल्याने कालवा प्रणालीद्वारे नियमित आवर्तनाच्या वेळापत्रकानुसार ५ एप्रिल २०२६ पासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ११ मे २०२६ अखेर एकूण १२.०० दलघमी मागणीपैकी ६.८१ दलघमी पाणी नाल्यांद्वारे प्रवाहित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील लाभार्थी गावे
गुरफळी, बाभळी, बनचिंचोली, वाटेगाव, हरडफ, धोत्रा, कामारी, पिंपरी, डोल्हारी, सिरपल्ली, सिल्लोड, एकंबा, कौठा, बोरगडी, धानोरा, वारंगटाकळी, मंगरुळ, साप्ती, मनुला (बु.), म्हाटाळा, पेवा दिघी, घारापूर, पळसपूर, डोल्हारी आणि विरसणी या गावांचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थी गावे
टाकळी, राजापूरवाडी, चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, सिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, भोजनगर, बिटरगाव, रतननाईकनगर, बोडका, पिंपळगाव, पेंदा, लिंगी, मुरली, मुळावा, हातला, दिवट, पिंपरी, पळशी, नागापूर, बारा चातारी, बोरी, कोप्रा, मानकेश्वर आणि सिंदगी या गावांना या विसर्गाचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!