
कृत्रिम टंचाई, लिंकिंग आणि चढ्या दराने विक्रीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन


नांदेड/हिमायतनगर, प्रतिनिधी| खरीप हंगाम २०२६ तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला निवेदन देत संबंधित खत विक्रेते व कृषी सेवा केंद्रांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.


जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा कृषी अधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर, तहसीलदार हिमायतनगर, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात अनेक खत विक्रेते शासन नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार, कृषी विभागाकडून खतसाठा मुबलक असल्याचे सांगितले जात असताना हिमायतनगरात खरीप हंगाम सुरू होताच कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. युरिया, DAP आणि 10:26 यांसारखी रासायनिक खते शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा प्रतिगोणी 100 ते 300 रुपयांनी अधिक दराने विकली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, अनेक दुकानांमध्ये अधिकृत दरफलक नसून ग्राहकांना पक्के बिल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


लिंकिंगच्या नावाखाली सक्ती, खत खरेदीसोबत टॉनिक, सूक्ष्म अन्नद्रव्ये, नॅनो खत किंवा इतर उत्पादने सक्तीने विकली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. एका DAP खताच्या गोणीसाठी अतिरिक्त साहित्य घेण्याची सक्ती होत असून, नकार दिल्यास “खत संपले” असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा प्रति एकर खर्च २००० ते ३००० रुपयांनी वाढत असून आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.



तालुका कृषी कार्यालय आणि संबंधित विभागांकडून प्रभावी नियंत्रण नसल्याची नाराजी शेतकऱ्यांमध्ये असून, भरारी पथके केवळ कागदावर असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनात तक्रारकर्ते वडगांवकर यांनी सर्व खत विक्रेते व कृषी सेवा केंद्रांचि संयुक्त तपासणी, साठा व विक्री नोंदींची पडताळणी, दोषी विक्रेत्यांचे परवाने निलंबित करणे, चढ्या दराने विक्री व लिंकिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे,

“नो लिंकिंग, MRP वर खत विक्री” मोहीम राबविणे खतसाठा व विक्री अहवाल सार्वजनिक करणे आदी मागण्या संदर्भात लक्ष देण्याची मागणी केली असून, शेतकऱ्यांसाठी टोल फ्री तक्रार क्रमांक सुरू करावी आणि शेतकरी हितासाठी प्रशासनाने खताचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी वामनराव पाटील वडगांवकर मिराशे यांनी केली आहे.
