डॉ. खुरसाळे यांची स्मृती कक्ष संकल्पना इतिहासाचा अभिमान जागवणारी

नांदेड| नांदेड येथील प्रसिद्ध चिकित्सक डॉ. सुरेश खुरसाळे यांनी अंबाजोगाई येथे मांडलेली स्मृती कक्षाची संकल्पना ही मराठवाड्याच्या इतिहासाचा अभिमान जागवणारी ठरत आहे. “दैदीप्यमान वारसा असणे ही एक गोष्ट, पण त्या वारशाबद्दल अभिमान न बाळगणे आणि पुढील पिढ्यांना त्याची माहिती न देणे ही मोठी शोकांतिका आहे,” या त्यांच्या विचारांनी उपस्थितांना इतिहासाच्या जतनाची जाणीव करून दिली.

अंबाजोगाई येथील स्मृती कक्षात मराठवाडा मुक्ती संग्रामातील संघर्ष, त्याग आणि योगदान यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. या स्मृती कक्षातून इतिहासातील सेनानी, सैनिक आणि त्यांच्या देशभक्तीपूर्ण कार्याचे दर्शन घडते. राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

डॉ. खुरसाळे यांच्या संकल्पनेतून “इतिहास केवळ वाचायचा नाही, तर अनुभवायचा आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा” हा संदेश देण्यात आला. या पार्श्वभूमीवर चळवळी योद्धे बसवंतराव मुंडकर प्रतिष्ठान यांनी महत्त्वाची मागणी पुढे आणली आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या समाधीस्थळीही अशाच प्रकारचा स्मृती कक्ष उभारण्यात यावा, अशी मागणी प्रतिष्ठानने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडे केली आहे.

ही मागणी पूर्ण झाल्यास मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास अधिक प्रभावीपणे जतन होईल आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी केंद्र उभे राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इतिहासाचा अभिमान जपत त्याचे संवर्धन करण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!