
नांदेड| सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी जपत गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, नांदेड यांच्या वतीने दिनांक 2 व 3 मे 2026 रोजी 71 वा सामूहिक विवाह महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन येथे सकाळी 11.30 वाजता माननीय पंज प्यारे साहिबान तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.




गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे दरवर्षी मे आणि डिसेंबर महिन्यात सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत 70 विवाह मेळावे यशस्वीरित्या पार पडले असून सुमारे 2400 हून अधिक जोडप्यांचे विवाह बोर्डाच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत. यंदाच्या मेळाव्यात देशातील विविध भागांतून आलेल्या 13 जोडप्यांनी विवाहबंधनात प्रवेश केला.




गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक स. विजय सतबीर सिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह महोत्सव पार पडला. तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक व उपस्थितांसाठी जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लंगर हॉलमध्ये कुलर व पंखे तसेच दशमेश हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना तत्पर ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. प्रशासक उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी नवदाम्पत्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा संदेश पाठविला. या कार्यक्रमात शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच प्रतिष्ठित नागरिकांचा विशेष सत्कार माननीय पंज प्यारे साहिबान यांच्या हस्ते करण्यात आला.



71 व्या सामूहिक विवाह मेळाव्यात संत बाबा बलविंदर सिंघ जी कारसेवा वाले (गुरुद्वारा लंगर साहिब), संत बाबा तेजा सिंघ जी (मुखी गुरुद्वारा माता साहिब), आजी-माजी सदस्य तसेच नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या सुपत्नी यांच्या हस्ते नवदाम्पत्यांना शुभेच्छा भेट देण्यात आली. नांदेडसह हैद्राबाद, करीमनगर, बीदर, औरंगाबाद, जालना, परभणी, खामगाव, मुर्तिजापूर आणि धानोरा (शीख) येथील वन्हाड मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.



कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक स. रविंदर सिंघ कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स. जैमल सिंघ ढिल्लो, स. बलविंदर सिंघ फौजी, स. विक्रमजीत सिंघ कलमवाले, स. जसबीर सिंघ शाहू, स. हरपाल सिंघ शिलेदार, स. गुरबचन सिंघ शिलेदार, स. चांद सिंघ, श्रीमती अनिलकौर खालसा, श्रीमती बबीताकौर चाहेल, स. सतविंदर सिंघ रामगडीया, स. परविंदर सिंघ वासरीकर, स. सतनाम सिंघ रागी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी व गुरुद्वारा लंगर साहिबच्या 100 सेवादारांनी विशेष सेवा बजावली.
