ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा; विसरलेली ओरिजनल डिग्रीची कागदपत्रे विद्यार्थ्याला केली परत

नांदेड | आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जीवनात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना नांदेडमधील एका ऑटो रिक्षा चालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे समाजासमोर आदर्श निर्माण झाला आहे. प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली अति महत्त्वाची ओरिजनल डिग्रीची कागदपत्रे संबंधित विद्यार्थ्याला सुखरूप परत करून रिक्षा चालकाने माणुसकीचे दर्शन घडविले.

ही घटना १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन 2026 रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या दरम्यान घडली. टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे सदस्य तथा रिक्षाचालक मिलिंद जोंधळे (रा. खोब्रागडे नगर, नवा मोंढा, नांदेड) हे नेहमीप्रमाणे प्रवासी वाहतूक करत होते.

दरम्यान, अमोल अंतकुरे (रा. शिरसी, पो. पेठवडज, ता. कंधार, जि. नांदेड) हे विद्यार्थी नमस्कार चौक ते रेल्वे स्टेशन असा प्रवास करून MH 26 BD 2796 या रिक्षातून घाईगडबडीत उतरले. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपली अति महत्त्वाची कागदपत्रांची बॅग रिक्षामध्येच राहिली आहे.

घाबरलेल्या अवस्थेत अमोल यांनी पुन्हा नमस्कार चौक परिसरात येऊन चौकशी केली. तेव्हा काही रिक्षाचालकांनी त्यांना टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) यांचा संपर्क क्रमांक दिला. विद्यार्थ्याने संघटनेच्या कार्यालयात जाऊन सविस्तर माहिती दिल्यानंतर तात्काळ रिक्षाचालकांच्या ग्रुपवर संदेश प्रसारित करण्यात आला.

दरम्यान, रिक्षाचालक मिलिंद जोंधळे यांनी स्वतःहून संघटनेचे पदाधिकारी सोनाजी पवार यांना संपर्क करून संबंधित बॅग आपल्या रिक्षामध्ये असल्याची माहिती दिली. त्यानंतर जोंधळे यांनी ती बॅग संघटनेच्या कार्यालयात आणून दिली.

टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्याला त्याची बॅग सुरक्षितपणे परत करण्यात आली. बॅगमध्ये ओरिजनल डिग्रीची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित पाहून अमोल अंतकुरे यांनी समाधान व्यक्त केले व रिक्षाचालक मिलिंद जोंधळे यांना ५०० रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला. तसेच टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे आभार मानले. या घटनेमुळे रिक्षाचालक मिलिंद जोंधळे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!