
नांदेड|महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नांदेड एज्युकेशन सोसायटी संचालित सायन्स कॉलेज, नांदेड येथे प्रा. आकाश करंडे लिखित ‘द महाराष्ट्र अर्थ सायन्स PYQ’s कॉम्पेंडिअम’ (‘The Maharashtra Earth Science PYQ’s Compendium’ ) या पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले. या पुस्तकाचे प्रकाशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदनानंतर प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी उपाध्यक्ष ॲड. प्रफुल अग्रवाल, सचिव प्रा. श्यामलताई पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे, उपप्राचार्य प्रा. एम. खिल्लारे आणि उपप्राचार्या डॉ. अरुणा शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.


हे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या भूशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे असून, विविध परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा सखोल संग्रह त्यामध्ये करण्यात आला आहे. भूगर्भशास्त्र, खनिजशास्त्र आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.


या सोहळ्याला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. बैनवाड, प्रबंधक गौतम वाघमारे, भूशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. आर. गायकवाड यांच्यासह प्रा. पवार, प्रा. राजेश आचेगावे, प्रा. डॉ. विनोद चव्हाण, प्रा. जोशी, प्रा. अंकिता वडजे, प्रा. प्रतीक्षा सुर्वे, प्रा. खुरांगे, प्रा. निलवर्ण आणि प्रा. पाटील आदींची उपस्थिती होती.


आपल्या पहिल्या पुस्तकाबद्दल बोलताना प्रा. आकाश करंडे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील भूशास्त्राच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी एकाच ठिकाणी सर्व प्रश्न उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती केली आहे.” त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
