
नांदेड| सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांना त्यांच्या सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कृतज्ञता सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केली.



डॉ. काब्दे यांच्या निवृत्ती निमित्त नांदेड एज्युकेशन सोसायटीतर्फे पुरणमल लाहोटी सभागृहात कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे नूतन अध्यक्ष सीए (डॉ.) प्रवीण पाटील होते. यावेळी उपाध्यक्ष ॲड. प्रफुल अग्रवाल, सचिव प्रा. श्यामल पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, कार्यकारिणी सदस्य ॲड. चिरंजीलाल दागडिया, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व मान्यवर उपस्थित होते.



या प्रसंगी डॉ. काब्दे यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. काब्दे यांनी आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेने आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या सहवासात काम करण्याची संधी लाभणे हे आपले भाग्य असल्याचे सांगितले. संस्थेत काम करताना सकारात्मक विचारांची माणसे मिळाली आणि त्यातूनच आयुष्य अधिक समृद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमात विविध मान्यवरांनी डॉ. काब्दे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा गौरव करत त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाची दखल घेतली. प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी डॉ. काब्दे यांच्या कार्यावर प्रकाश टाकत, त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी केली तसेच पुढील पिढीसाठी त्यांनी आत्मकथन लिहावे, अशी विनंतीही केली.


अध्यक्षीय समारोपात सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी डॉ. काब्दे हे निवृत्त झाले असले तरी त्यांचे मार्गदर्शन पुढेही संस्थेला लाभत राहील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. काब्दे यांना मानवंदना देत करण्यात आली.या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त प्राध्यापक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
